Features

नाट्य कलादर्शक: भालचंद्र पेंढारकर
(Kamlakar Nadkarni recalls Bhalchandra Pendharkar's contribution to theatre on his 1st death anniversary)




कमलाकर नाडकर्णी


अकरा ऑगस्ट दोन हजार सोळा हा ख्यातनाम गायक नट, निर्माता भालचंद्र पेंढारकर यांचा पहिला स्मृतिदिन.त्या निमित्ताने त्यांच्या रंग कर्तृत्वाला ही आदरांजली.

"एक देदीप्यमान कालखंड मी जगलो. अनेक दिग्गज कलावंतांचा सहवास मला लाभला. त्यांच्याबरोबर मला वावरायला मिळालं. मी भाग्यवान आहे. तृप्त आहे. कृतार्थ आहे." हे उद्गार आहेत चौऱ्यान्नवितल्या एका ज्येष्ठ नाट्यकलावंताचे. भालचंद्र पेंढारकर या श्रेष्ठ गायक नटाचे. हा आहे त्यांनी त्यांच्या मृत्युपूर्वी दोनच महिने अगोदर प्रकट केलेला अण्णांचा संजीवक संवाद.

बहुतेक वृद्ध नाट्यकलावंत आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दिवसात कसलीतरी खंत उराशी बाळगत असतात. जखम भळभळती ठेवून जातात. अण्णा पेंढारकर मात्र या वस्तुस्थितीला अपवाद होते.

वयाच्या कोवळ्या एकविशीत, २८ नोव्हेंबर १९४२ मध्ये पूर्वानुभव नसताना ‘चंदू’ने पित्याच्या पाठोपाठ ‘ललितकलादर्श‘ या संस्थेची पुन्हा स्थापना केली. वडिलांनी गाजवलेली ‘वैकुंठ’ची भूमिका स्व्त; करून रसिकांना बापूरावांचा साक्षात्कार घडवला.

तेंव्हा पासून ते संस्थेचा शतक महोत्सव साजरा करेपर्यत अनेक संकटांचे डोंगर त्यांना पार करावे लागले. पण प्रत्येक वेळी ते चैत्यन्यशील राहिले. उत्फुल्ल राहिले. अखेरपर्यंत ते आनंदयात्रीच होते. याच महिन्यात त्यांचा पहिला स्मृतिदिन साजरा होत आहे, त्याच निमित्ताने ही आठवणींची आदरांजली!

नाटक हा अण्णांचा ध्यास होता तर संगीत रंगभूमी हा त्यांचा श्वास होता. हल्ली संगीत रंगभूमीला बरे दिवस आले आहेत. त्याचं कारण दोन अण्णांनी घेतलेले अविरत श्रम आणि त्यांची जिद्द हे आहे. अण्णा गोखले आणि अण्णा पेंढारकर. ‘पंडितराज जगन्नाथ’ ‘आणि ‘जयजय गौरी शंकर’’या दोन अस्सल संगीत नाटकांमुळे आणि त्यांच्या अप्रतिम सादरीकरणामुळे कित्येक दिवसांची संगीत नाटकांची ‘बंदिशी’पुन्हा खुली झाली. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळायला लागला. स्वातंत्रोत्तर काळात मराठी रंगभूमीला परत संगीत रंगभूमीचा सुवर्ण नसला तरी रुपेरी काळ दाखवण्याचं श्रेय ज्या दोन श्रेष्ठीना द्यावं लागेल त्यातील एक भालचंद्र पेंढारकर आहेत, हे विसरून चालणार नाही.

केवळ संगीत नाटक सदर करूनच पेंढारकर थांबले नाहीत. नाट्य संगीत कसं गावं, किती गावं, बैठकीच्या गाण्यात आणि रंगमंचावरील नाटकाच्या गाण्यात कुठला फरक आहे, याची एक शास्त्रशुध्द पध्दत त्यांनी स्वतःच्या अनुभवांनी विकसित केली आणि तिचं शिक्षण त्यांनी उदयोन्मुख कलावंताना दिलं. मुंबई विद्यापीठाच्या ‘अकादमी ऑफ थिएटर आर्टसच्या’ विद्यार्थ्यांची एक कार्याशाळाच त्यांनी घेतली. त्या मुलांना प्रत्यक्षानुभव देण्यासाठी त्यांचं, ‘सं.शारदा’ नाटक त्यांनी मन्च्वानित केलं. त्यांचा नाट्यसंगीत शिक्षण अध्यापनाचा वारसा गेली काही वर्षे नाटककार विद्याधर गोखले यांच्या कन्या शुभदा दादरकर चालवीत आहेत. किती विविध प्रकारच्या भूमिका अण्णांनी केल्या! ऐन एकविशीत त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील देशभक्त तरूण ‘सत्तेचे गुलाम’मध्ये उभा केला. त्यानंतर ‘स्वामिनी’मध्ये पोरींना प्रेमात पाडणाऱ्या युवकाच्या भूमिकेत ते दिसले. ‘दुरिताचे तिमिर जावो’मध्ये कारुण्यपूर्ण ‘दिगू’त्यांनी प्रकट केला. ’पं.जगन्नाथ’मधला गाणारा महाकवी तर त्यांनीच करावा...’शारदा’ नाटकातला त्यांचा रंगेल आणि लंपट भुजंगनाथ बघणं हा एक वेगळाच अनुभव होता. ’होनाजी बाळा’तला त्यांचा खेळकर बाळा विसरताच येत नाही. बावनखणीतला ‘खंडोशंकर’ सगळ्या प्रेक्षकांनाच आपलसं करायचा .आणि ‘रक्त नको मज प्रेम हवे’मधला त्यांचा चिनी ‘वाँ‌ग’ तर खऱ्या चिन्यालाही लाजवेल असा होता. अण्णांचा वेगवेगळा अभिनयाविष्कार म्हणजे एक कॅलीडोस्कोप होता अगदी शोभादर्शकच आणि इतकं असूनही त्यांना ‘नटश्रेष्ठ’, ‘नटसम्राट’ अशा उपाधी कुणी लावल्या नाहीत. त्यांनी लावू दिल्या नाहीत. ‘गायक नट’ एवढ्यावरच ते समाधानी होते. पोकळ पदव्यां‌पेक्षा आशयपूर्ण अभिनयात त्यांना अधिक रस होता.

अण्णांची कलादृष्टी नेमकी कुठच्या बाजुची याबद्दल माझ्या मनात नेहमी संभ्रम निर्माण व्हायचा. ज्यांनी ’सत्तेचे गुलाम’ सारख्या आधुनिक राजकीय नाटकाने संस्थेची पुनर्स्थापना केली, ’पंडितराज जगन्नाथ’.(महाकवीचं चरित्र)’जय जय गौरी शंकर’ (पौराणिक नाटकाला तत्कालीन राजकारणाची डूब), ’रक्त नको मज प्रेम हवे’ (चिनी व्यक्तिरेखांचे मुद्दाम अनुवादित करून घेतलेले आगळ्या संघर्षाचे पाश्र्च्यात्य नाटक) ‘बावनखणी’ ‘(लोककला प्रकारावर आधारलेले भरत नाट्यशास्त्रांनुसार नेपथ्य रचलेले) ’झाला अनंत हनुमंत’ (प्रायोगिक नाटककाराचे प्रायोगिक नाटक) अशी एकाहून एक प्रागतिक आणि पुरोगामी विचारांची नाटकं अण्णांनी सादर केली. धंद्यापेक्षा नाटक मोठं मानलं. प्रसंगी त्यासाठी तोटा सहन केला. त्याच अण्णांनी प्रतिगामी विचारांची पाठराखण करणाऱ्या ‘स्वामिनी’सारख्या खोट्या नाटकाचा खेळ का करावा? ’दुरिताचे तिमिर जावो’ सारखं भाबडं बाळबोध, दिगुबुवाचं नाटक का का करावं? विचारांती मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं. एका अण्णांची पारंपारिकतेवर नितांत श्रद्धा आहे, कडवी धारणा आहे (सामाजिक जीवनात धोतर आणि कोट हा त्यांचा वेश त्यांनी अखेरपर्यंत कधी बदलला नाही) दुसऱ्या अण्णा पेंढारकरांना नाविन्याची, मनस्वी ओढ आहे प्रायोगतेची धडाडी आहे. (पित्याचा वारसा) एका अण्णात दोन भालचंद्र होते आणि तरीसुद्धा त्यांनी सादर केलेल्या नाटकांत नाविन्यपूर्ण आणि चाकोरीबाह्य नाटकांचीच संख्या अधिक भरते. एकूण पेंढारकरांची नाट्यदृष्टी ही छापाकाटा स्वरूपाची होती. छापा चाकोरीतल्या नाटकांचा तर काटे बिन चाकोरीतल्या नाटकांचे. नाणं कोणतं‌ही असो ते खणखणीत वाजावं यासाठी मात्र अथक परिश्रम.

मराठी रंगभूमीचा फार मोठा द्स्ताऐवज अण्णांनी संग्रहित करून ठेवला आहे. त्यात नाटकांची दुर्मीळ छायाचित्रे, अनेक ध्वनीफिती, चित्रफिती, जुन्या नाटकांची पुस्तके, नाट्य विषयक मासिके, नियतकालिके यांचा मोठा साठा त्यांनी आपल्या मागे ठेवला आहे. जे काम नाट्यपरिषदेने करायला पाहिजे ते अण्णांनी दूरदृष्टीने अगोदरच करुन ठेवलं आहे. आता तरी नाटयपरिषदेने हा अनमोल ठेवा जतन करून परिषदेच्या वास्तूत त्याचे कायम स्वरूपी प्रदर्शन उभे केले पाहिजे. रवींद्र नाट्य मंदिरला पु. ल. देशपांडे कलादालन आहे. तसेच यशवंत नाट्य मंदीरला भालचंद्र पेंढारकर नाट्य दालन असायला हवे. अखिल भारतीय नाट्य परिषदेने दरवर्षी केवळ नाट्य संमेलने भरवण्यातच धन्यता मानण्याऐवजी असे एखादे अॅकॅडमिक काम करायला काय हरकत आहे? तीच अण्णांना खरी श्रध्दांजली ठरेल...

*Kamlakar Nadkarni has been a drama critic for 45 years. He has received various awards for the same from institutions such as the Akhil Bhartiya Natya Parishad. He has written a book on Chattrapati Shivaji and has also published books on theatre. His book ‘Mahanagari Natak’, published in 2015, is a compilation of his critical writing on plays he saw between 2000 and 2010. His upcoming book ‘Natki Natak’ will dwell on the history of the Maharashtra State Competition plays, right from Annasaheb Kirloskar. He was an active worker for ‘Bal Rangbhoomi’ along with Sudha Karmakar. He has written six plays of which 351390 won an award at the Maharashtra State Competition. Kamlakar Nadkarni has been an actor in his younger days and has won medals for acting in state competition plays.


read / post your comments

   Features

- 60 Years of TO MEE NAVHECH (new)
- Tribute to Annabhau (new)
- Satish Alekar's New Play (new)
- A Book On Jayant Pawar's Plays
- Summer Is Here
- World Theatre Day Message
- World Theatre Day After The Unlocking
- Tribute To Burjor & Ruby Patel
- Reopening of Theatre Spaces in Mumbai
- Thespo 23 Digital Youth Festival
- Comment: Tribute to Jayant Pawar
- THESPO AUDIO-TORIUM
- Thespo: Young Live Digital | The light Catcher
- Playwrights & The Pandemic
- Keeping The Show Going
 
    Archives


   Discussion Board




Schedule


Theatre Workshops
Register a workshop | View all workshops

Subscribe


About Us | Feedback | Contact Us | Write to us | Careers | Free Updates via SMS
List Your Play