Review

AMAR PHOTO STUDIO

AMAR PHOTO STUDIO Play Review


Deepa Karmalkar


Direction : Nipun
Writer : Mansvivani
Cast : Amay Wagh, Sakhi Gokhale, Suvrat Joshi, Pooja Thambre and Siddhesh Purkar


 AMAR PHOTO STUDIO Review

मनस्विनी लता रवींद्र आणि इरावती कर्णिक या दोन युवा नाटककर्तींकडे मराठी रंगभूमी मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. आपल्या 'छापा काटा' या उत्तम नाटकाने मुख्य प्रवाहात प्रथमच सामील होऊन ती अपेक्षा इरावतीने बरीचशी पूर्ण केली आहे आणि आता मनस्विनीनेही 'अमर फोटो स्टुडिओ'या आपल्या नव्या नाटकाने मुख्य नाट्यप्रवाहात एका तरुण आगळ्या वेगळ्या नाटकाची भर टाकली आहे. या नाटकाबरोबरच निपुण धर्माधिकारी हा एक उमदा तरुण दिग्दर्शकही व्यावसायिक रंगभूमीला लाभला आहे. यापूर्वी त्याने दोन जुनी संगीत नाटकं व्यावसायिक रंगभूमीला दिली आहेत. पण त्यात, तो त्याचा पिंड नाही, हेच त्यानं सिद्ध करून दाखवलं. 'अमर फोटो स्टुडिओ' या नाट्यप्रयोगात मात्र त्याने आपल्या कौशल्याचा चांगलाच प्रभाव पाडला आहे. या प्रयोगाशी संबंधित सर्वच रंगकर्मी राष्ट्रीय नाट्यशाळेचे आणि पुण्याच्या ललितकला केंद्राचे प्रशिक्षित उत्तीर्ण विध्यार्थी होते हे विसरून चालणार नाही.

'दिल दोस्ती आणि दुनियादारी' या दूरदर्शनवर नुकत्याच गाजलेल्या मालिकेचे अमेय वाघ, सुब्रत जोशी, सखी गोखले हे तीन कलावंत एकत्र आले आणि त्यांनीं आपली 'कलाकारखाना'ही नाट्यसंस्था स्थापन करून तिच्यातर्फे हे नाटक प्रस्तुत केलं आहे. निर्मात्याला आवडलेल्या नाटकात काम करण्याऐवजी आपल्याला आवडलेल्या नाटकासाठी या मंडळींनी 'सुबक'चे निर्माते सुनील बर्वे यांनाच पाचारण केलं आणि त्यांनी आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. तेही नव्यादृष्टीचे नाट्यकलावंतच. मनस्विनीने त्या सगळ्यांना अक्षरसाथ दिली (तीही दि.दो.दु.ची लेखिका ) आणि भट्टी छान जमून गेली.

काळच फक्त अमर आहे आणि कॅमेराच फक्त तो पकडू शकतो म्हणून आपल्या 'अमर फोटो स्टुडिओ'त' आलेल्या 'अपु'ला आणि 'तनू'लाम्हातारा फोटोग्राफर तिन्ही काळातच फिरवून आणतो. त्या सफरीचा चित्तचक्षुचमत्कारिक खेळ म्हणजेच हे नाटक.

ए.जी.वेल्स यांच्या 'टाईममशीन'मधला काळ फार जुना आहे. या नाटकातला काळ अलीकडचा म्हणजे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असा आहे. नाटकातले अपु आणि तनु हे प्रियकर-प्रेयसी आहेत. अपु फार घाबरलेला आहे. फेसबुकवर प्रतिकूल मत दिलं म्हणून लोक आपल्याला मारतील की काय, याची त्याला भीती वाटतेय. तो सत्तावीस वर्षांचा आहे आणि त्याला वाटतंय आपण बहात्तर वर्षांचे झालो आहोत. खरी भीती वेगळीच आहे. त्याचे वडील त्यांच्या सत्ताविसाव्या वर्षीच घरातून नाहीसे झाले. वडलांचे वडील म्हणजे आजोबादेखील वयाच्या स्त्ताविसाव्याच वर्षीच घरातून गायब झाले.आणि आता तो परदेशी जाणार आहे तर तो देखील गायब.....म्हणजे कसलीच शाश्वती नाही आणि तरी देखील तो तनुवर प्रेम करतोय. बाळबीळ झाल्यानंतर तो नाहीसा झाला तर? तो जाम धास्तावला आहे. पण तनु बिनधास्त आहे. तिला फक्त वर्तमानातच जगायचं आहे. ती त्याला वर्तमानात आणते. 'अमर फोटो स्टुडिओ'त नेते तर फोटोग्राफर चेतावणीच देतो. तो म्ह्णतो ''मी काळ विकतो. मी काळ गोठवतो. नवं जुनं सगळं सापेक्ष आहे. आजचा काळ तुमच्यासाठी नवा, पण तुमच्या मुलांसाठी जुना. मागचा काळ तुमच्यासाठी जुना पण तुमच्या वडिलांसाठी. कोणता काळ कोणासाठी नवा? ओळखा मग तुमचा काळ खरा नवा की तुमच्या खापर पणजोबांचा काळ खरा नवा? म्हातारा फोटोग्राफर मग त्यांना काळाचीच सफर घडवतो. हताश झालेला, प्रेमात ब्रेक अप घेवू पाहणारा अपु म्हाताऱ्या फोटोग्राफरच्या काळाच्या फेऱ्यात सापडतो आणि मग विणला जातो कालच्या आणि आजच्या माणसांचा, आजच्या आणि परवाच्या माणसांचा एक विलक्षण गोफ.

कालच्या काळातली नटाकडून छळणूक केली जाणारी सिनेमातली नटी चंद्रिका अपुला भेटते. ती अपुच्या प्रेमातच पडते. अपुला व्ही.शांताराम भेटतात. ते त्याला साहाय्यक म्हणून काम करायला बोलावतात. अपुला गुरुदत्त, बिमल राय, राजकपूर यांच्याबरोबरही काम करायचं आहे. कारण या दिग्दर्शकांचे पिक्चर्स गाजणार हे त्याला अगोदरच माहित आहे (तो त्याच काळातून मागच्या काळात आलाय)मध्यंतरी तर आता सत्तर वर्ष पुढे कसं जायचं?असा प्रश्न त्याला पडतो. तनु इमरजन्सीच्या काळात जाते.दोघे वेगवेगळ्या काळात फिरत असल्यामुळे एकमेकांना भेटत नाहीत. तनुलाही आता वीट आलाय. तिला अपूचं तोंडच बघायचं नाही. या फेऱ्यात तनुला तिचे बाबा भेटतात. ते बालकवींच्या कविता म्हणतात.ती त्यांना जायला देत नाही. तेव्हा ते तिची समजूत काढतात म्हणतात,''.मला जावू दे .मी तुझ्या आईला भेटलो नाही तर तू कशी होणार?'(भविष्यात तुझ्या आईशी भांडण होणार म्हणून वर्तमानाच्या आनंदाला का पारखा होवू?) अपुलाही त्याचे वडील भेटतात. पण ते अपुलाच आपले वडील समजतात. कोण कुणाचे वडील?कुठला काळ नवा कुठला जुना?

अशा फेरफटक्यातून एकमेकांना शोधत अपु आणि तनु काळाचे पडदे मागेपुढे सारत परस्परांना भेटतात. आणि मग ते वर्तमानातच जगणार हे एकमेकांना दिलेल्या ओष्ठ्यद्वयांच्या शिक्का मोर्तबाने जाहीर करतात. अखेरीस म्हातारा फोटोग्राफर म्हणतोच ''स्थलकालाचे पाश मोडून शेवटी राहतं ते संगीत,कृष्ण धवल पटातले क्लोजअप्स, कॅनव्हासवरचे ऑईल पेन्टचे स्ट्रोक्स....राहत ते अथांग अमर्याद व्यक्त अव्यक्त प्रेम. काळाच्या मौतला बघितलंय कुणी?''

वेगळ्या वातावरणातल्या, वेगळी कारणमीमांसा करणाऱ्या एका रम्य प्रेमकहाणीचा सुखद अनुभव हे नाटक देते. भूत किंवा भविष्य काळातल्या माणसांनी रंगमंचावर धुमाकूळ घातलेली नाटकं मराठीत थोडी नाहीत. काही गंभीरप्रकृतीचीही आहेत. पण एक वैश्विक आशय घेवून फॅन्टासीच्या आधाराने युवा प्रेमकहाणी सादर करण्याचा हा बहुधा पहिलाच यशस्वी प्रयत्न असावा.

तरूणांचं भावजीवन, त्याचं जगणं हे मनस्विनीच्या नाट्यलेखनाचं क्षेत्र आहे. पारंपारिक नीती कल्पनामुळे त्यांची होणारी घुसमट, त्यांच्या मानसिकतेवर पालकांच्या वर्तनामुळे होणारा परिणाम असे विषय तिच्या या पूर्वीच्या नाटकातून आले आहेत. ('सिगारेट्स', 'अलविदा' 'तिच्या वाटणीचं खरं खुरं' 'लख लख चंदेरी') या नाटकातला युवा प्रियकर भूतकाळाच्या भीतीनेच धास्तावला आहे. त्या भीतीने तो वर्तमानापासून दूर दूर जावू पाहतोय. भूतकाळाच्या दबावात तो कसला निर्णयच घेवू शकत नाही. काळाला मध्यस्थ करून हा आशय मनस्वीने रंजकपणे खुलवला आहे. प्रदीप मुळे यांच्या कल्पक नेपथ्याने अनेक गोष्ठी एकाच वेळीय साध्य केल्या आहेत. एकूण रंगसंगतीतूनच ही फॅन्टसी आहे हे सहज समजून येतं. वेगवेगळ्या पार्श्वदेख्यावरून विविध स्थळाचं सूचन तर होतंच पण ते देखावे एकत्रितपणे एक मोठ्ठा फोटो स्टुडीओ साकार करतात अगदी मधून येणाऱ्या गोलाकार उतरंडीसह. नाटकातील चित्रपटविश्व केवळ या उतरंडीने मनोमन ठसते. शिवाय म्हातारा उतरंडीवरून प्रवेशतो तेव्हा नाटकातला काळच आकाशातून पृथ्वीवर उतरल्याचा भास होतो. थोडक्यात पात्रांअगोदरच नेपथ्य प्रेक्षकांशी संवाद साधतं. या नाटकाची वेगळी जातकुळी प्रेक्षकांना पटवत अवघ्या नाटकाच्या आशयविषयाशी आस्वादकांबरोबर मैत्री जोडणार असं नेपथ्य क्वचितच दृष्टोपत्तीस येतं. धन्यवाद प्रदीपजी!.एक चाकोरीबाहेरचं नाटक नेपथ्यामुळे आकलनाच्या अगदी जवळ आलं. दिग्दर्शनालाही त्यामुळे उठाव मिळाला.

दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याने नेपथ्यकाराने प्राप्त करून दिलेल्या अवकाशाचा कोपरान् कोपरा अगदी हुशारीने वापरला आहे उतरंडीच्या डाव्या-उजव्या बाजूंच्या अभिनय क्षेत्रांची योग्य निवड करून भूतकाळ आणि वर्तमानकाळ छान प्रस्थापित केला आहे. काही ठिकाणी हे काळ रंगमंच व प्रेक्षागृह यांच्या अदलाबदलीच्या वापरानेही सिद्ध केले आहेत. प्रेक्षकांत पात्रांनी उतरणे ही येथे च्युस किंवा फॅशन न वाटता ती संहितेची गरज वाटते. विन्गेतली मारमारी, मुलगा व वडील या दोन पात्रांची एक पात्री तोंड फिरवणी उत्तमरीत्या आकारास आणली आहे. याचे श्रेय प्रकाश योजनाकार श्रेयस तळपदे यांचे. त्यांनी प्रकाश योजनेत साधलेला ताल आणि रंगसंगती हे फॅन्टसीला सहाय्यभूत ठरले आहेत एकूण प्रयोगच दिग्दर्शकाने विशिष्ट ठेक्यात बसवल्यामुळे तो प्रभावी झाला आहे. निपुणचं अलीकडच्या काळातलं हे पहिलंच लक्षणीय दिग्दर्शन. अपुच्या भूमिकेत सुब्रत जोशी याने आपल्या आत्मविश्वासचं दर्शन घडवलं. अपुची संभ्रमावस्था त्याने योग्य त्या छटांसह प्रकट केली. बाप व मुलगा या दोन व्यक्तिरेखांचं एकपात्री आविष्करण त्यानं प्रभावी केलं


नाटकातली 'तनु'ची भूमिका सखी गोखलेने तुडतुडी सारखी तडीस नेली आहे.सखी प्रत्यक्षातही तनु सारखीच असावी. त्यामुळेच सखीला 'तनु' भन्नाट जमली आहे. तिच्या प्रकटीकरणातून आजच्या सुशिक्षित आणि सुस्थित युवतीचे यथार्थ दर्शन घडते. जे संहीतेतच अनुस्युत आहे. ती नाटक करीतच नाही ती स्वत;चंच जगणं जणू रंगभूमीवर जगतेय. तिच्या धडाकेबाज नृत्यासह तिची, भूमिकेला योग्य असलेली रंगमंचीय हालचाल दाद देण्याजोगी आहेच .पण यापेक्षा वेगळी आणि गंभीर भूमिका जेव्हा तिच्या वाट्याला येईल तेव्हाच तिच्या अभिनयातील गुणवत्तेबद्दल नक्की अनुमान काढता येईल.

पूजा ठोंबरेच्या 'चंद्रिके'ने आपल्या रंगतदार नृत्यातून जुन्या जमान्यातल्या गीताबालीची आठवण करून दिली. आपल्या उच्चारांवर, आवाज फेकीवर तिने अधिक श्रम घेण्याची गरज आहे. सिद्धेश पुरकर याने जुन्या नटाचा आब राखला. आवाज बदलून अमेय वाघने उभा केलेला म्हातारा प्रभावी होता. त्याने उभी केलेली व्ही.शांताराम यांची भूमिका प्रतीकात्मकच म्हणायला हवी. कारण ती फरकॅप पुरतीच खरी वाटली.


जोशपूर्ण संगीताचे श्रेय श्री. गंधार याचे तर योग्य वेशभूषेचे व रंगभूषेचे श्रेय अनुक्रमे कल्याणी गुगळे व संतोष बिलबिले यांचे.

अशा गुण विशेषांनी परिपूर्ण असा हा 'अमर फोटो स्टुडिओ' म्हणजे काळ बदलाचा एक जोशिला आटयापाटया आहे. तरुणांना तो रिझवेलच पण ज्यांना तरुण व्हावसं वाटतं त्यांनाही रंगवेल. हर्बलचे सुनील बर्वे, एक दर्जेदार नाटक व्यवसायिक रंगभूमीला प्रदान करण्यास सहाय्यभूत ठरले आणि आपण अस्सल रंगकर्मी आहोत हे त्यांनी सिद्ध केलं.

मनस्विनीचे यापुढचे व्यावसायिक रंगभूमीवर येणारं नाटक थोडं रंजकतेपलीकडचं असेल अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे?

*Kamlakar Nadkarni has been a drama critic for 45 years. He has received various awards for the same from institutions such as the Akhil Bhartiya Natya Parishad. He has written a book on Chattrapati Shivaji and has also published books on theatre. His book 'Mahanagari Natak', published in 2015, is a compilation of his critical writing on plays he saw between 2000 and 2010. His upcoming book 'Natki Natak' will dwell on the history of the Maharashtra State Competition plays, right from Annasaheb Kirloskar. He was an active worker for ‘Bal Rangbhoomi’ along with Sudha Karmakar. He has written six plays of which 351390 won an award at the Maharashtra State Competition. Kamlakar Nadkarni has been an actor in his younger days and has won medals for acting in state competition plays.


   AMAR PHOTO STUDIO Play Schedule(s)
No upcoming shows.

Please click here for the preview of the play

read / post your comments


   Discussion Board




Schedule


Theatre Workshops
Register a workshop | View all workshops

Subscribe


About Us | Feedback | Contact Us | Write to us | Careers | Free Updates via SMS
List Your Play