Review

DARYA BHAVANI

Direction : Dr. Anil Bandiwadekar
Writer : Sangeet Vichare
Cast : Jayant panase, Sachin Limaye, Prasad Vaidya, Nilesh Patil, Anoop Singh, Dharmashree Dharpawar, Sachin Gajmal, Rohit Hawale

DARYA BHAVANI Play Review


Meghana Bhuskute



 DARYA BHAVANI Review


इतिहासाचा साज वापरून समकालीन विषय चपखलपणे मांडणारी ऐतिहासिक नाटकं मराठी रंगभूमीला नवी नाहीत, तशीच निव्वळ देखावे नि शालूशेले वापरून डोळे दिपवून टाकणारी वा कंठाळी आरडाओरडा करणारी पोशाखी, राणा-भीमदेवी थाटाची ऐतिहासिक नाटकंही नवी नाहीत. गो. नी. दांडेकरांच्या एका इतिहासाधारित कादंबरीशी नामसाधर्म्य असलेलं 'दर्या भवानी' हे नाटक मात्र यांपैकी कोणत्याच नाटकांमध्ये मोडणारं नाही.
त्यात विचार नाही, संघर्ष नाही, रंजनही नाही - कुठल्याही प्रकारचं नाटकपणच मुळी नाही.

काळाची पावलं अचूक ओळखून शिवाजीनं समुद्री सीमा राखण्यासाठी ठाम पावलं उचलली हे ऐतिहासिक तथ्य. त्यात नाट्याची बीजं आहेत. पण ती उगवून येण्यासाठी थोडी तरी मशागत करणं आवश्यक आहे. नाटकात मशागतीमधला 'म'ही नाही.

नाटकाचं लिखाण प्रचंड कच्चं आहे. सूत्रधाराचा आव आणणारी कुठलीशी दोन पात्रं एकमेकांना गोष्ट सांगितल्याप्रमाणे नाटकाचा कथाभाग घोळून घोळून सांगतात. त्यात नक्की कोणत्या पात्राला गोष्ट ठाऊक आहे, हेही नाटककाराच्या धड लक्ष्यात राहिलेलं दिसत नाही. कारण एकाच दृश्यात गोष्ट सांगणाराच नट 'आसं का? मंग वो?' असे कुतूहलदर्शक भाव यथाशक्ती चेहर्‍यावर थापून प्रश्न विचारू लागतो. इतका वेळ प्रश्न विचारणारा समोरचा नट मग 'आलिया भोगासी..' थाटात कथेकरीबुवाची भूमिका पार पाडू लागतो. ही कथा तरी रंजक पद्धतीनं सांगितली जावी, ही माफक अपेक्षाही पूर्ण होत नाही. तेच तेच, तेच आणि तेच बोलत शिवाजीच्या नावानं ठरीव स्तुतीपाठ आळवत प्रकरण कसंबसं, रगदळत-मरगळत पुढे सरकत राहतं. कसलाही आगापिछा नसलेली पात्रं आळीपाळीने येऊन साचेबद्ध बडबड करतात.

या कथाभागाला अजिबात पुढे न नेणारी, नव्वदीच्या दशकापूर्वीच्या हिंदी सिनेमातल्या गाण्यांना लाजवतीलशी ध्वनिमुद्रित गाणी आणि त्याला जोड देणारी समूहनृत्यं नाटकात खच्चून भरलेली आहेत. त्यातही, काही मोजकेच कलाकार मनापासून नाचण्याचे कष्ट घेतात.

एखाद्या वार्षिक स्नेहसंमेलनातल्या हौशी नाटकाच्याही पातळीला न पोचणार्‍या या नाटकातला अभिनय, संगीत, नेपथ्य, प्रकाश इत्यादी बाबींवर बोलण्यासारखं काही नाही. समुद्री किल्ला बांधला जाणं हेच ज्या नाटकाचं कथानक आहे, त्या नाटकात मंचावर दिसणारा एका बेटाचा देखावा सुरुवातीपासून शेवटापर्यंत एकदाही बदलत नाही; तसंच शिवाजीच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्या मोरोपंतांचा अभिनय वठवणारा नट मधूनमधून चक्क बोबडं बोलतो. आता यापलीकडे काही बोलण्यासारखं उरतं काय?
असो.

ता. क. : या कल्पनादळिद्री गोंधळानं आपले तीन तास खाल्ले या चिडचिडीखेरीज एकच प्रश्न अखेर मनात रेंगाळला - गो. नी. दांडेकरांच्या कादंबरीचं कथानक आणि शीर्षकही वापरण्याबद्दल आणि त्याची अशी विटंबना होऊ देण्याबद्दल दांडेकरांच्या वारसदारांचं काहीच म्हणणं नाहीय का, हा तो प्रश्न.

मेघना भुस्कुटे भाषांतरकार आणि मराठी ब्लॉगर असून भाषा, साहित्य आणि प्रमाणलेखन या विषयांत तिला विशेष रस आहे. अनेक ऑनलाईन आणि छापील नियतकालिकांतून तिने लेखन व संपादन केले आहे.

read / post your comments




   Discussion Board


Schedule


Theatre Workshops
Register a workshop | View all workshops

Subscribe


About Us | Feedback | Contact Us | Write to us | Careers | Free Updates via SMS
List Your Play