Review

CODE MANTRA (MARATHI)

Direction : Rajesh Joshi
Cast : Mukta Barve, Ajay Purkar, Umesh Jagtap, Atul Mahajan, Kaustubh Diwan, Faiz Khan, Sanjay Khapre, Milind Adhikari, Vikram Gaikwad, Amit Jambekar, Swati Bovlekar, Sanjay Mahadik and Ajay Kasurde

CODE MANTRA (MARATHI) Play Review


कमलाकर नाडकर्णी CODE MANTRA (MARATHI) Review
 Schedule
No upcoming shows.


सर्व सामान्य माणूस प्रत्यक्ष युध्दापासून लांब असल्यामुळे युध्दाच्या कथा त्याला नेहमीच रम्य वाटतात. कथा-कादंबऱ्या यांच्यातून तो वाचतो किंवा चित्रपटातून पाहतो, तेव्हा त्या त्यांच्यासाठी फॅन्टसीज असतात. पण लष्कराच्या आतल्या गोटात काय चालू असते याचा थांगपत्ता कुणालाच नसतो. लष्कराची दैनंदिन कार्यप्रणाली कमालीची गुप्त राखली जाते. म्हणूनच ती जाणून घेण्यासाठी तो भलताच उत्सुक असतो. सैनिक हा शूरवीर असतो. तो कसा घडतो हे पाहण्यातील उत्कंठा 'कोड्मंत्र' हे नाटक काही प्रमाणात तरी शमवतं. इंग्रजीतून हे नाटक गुजराथीत आलं. तिथं तुफान वाजल्यामुळे ते मराठीत संचलन करतं झालं.

लष्कराच्या अंतस्थ व्यवस्थेचा काही भाग हे या नाटकाचे आवरणनाट्य आहे. आत एक न्यायालयीन नाटक (कोर्टरूम ड्रामा) आहे. या दोन्ही विशेषांचं बेमालूम मिश्रण हेच या नाटकाच्या लक्षवेधतेचं आणि लोकप्रियतेचं खरं कारण आहे. (देशभक्ती जागृत करणे हे या नाटकाचं काम नव्हे. तसे लेबल या नाटकाला लावणे हा बाजारू दृष्टीकोन झाला.) थरारक करमणूक करणारं आणि यशाची खात्री देणारं हे दणकेबाज व्यावसायिक नाटक आहे. आजच्या मुळमुळीत नाटकांपेक्षा ते कितीतरी गुणकारी आहे. माता-पित्याची भावुकता हा 'हुकमी एक्का' समजल्या जाणाऱ्या व्यावसायिक गुणाची फितही या लष्करी गणवेशाला लावलेली आहे. (मराठी प्रयोगात ही भावुकता भडक किंवा भावव्याकुळ होत नाही, ही आनंदाची बाब आहे.)


गोव्याच्या 'हंस थेटर' या संस्थेने १९९८ साली राज्य नाट्य स्पर्धेत 'कोर्टमार्शल' नावाचं नाटक केलं होतं. ते नाटकही इंग्रजीतून गुजराथीत आणि मग मराठीत आलं होतं. त्या नाटकातही सैनिक व त्यांची हालचाल होती, पण तेथे धनप्राप्ती हे लक्ष्य नसल्यामुळे सैनिकी वातावरण ही केवळ सूचक पार्श्वभूमी होती. न्यायालयीन नाट्य आणि प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला वाव देणे हेच मुख्य साध्य होतं.

मराठी व्यावसायिक रंगमंचावर लोकप्रिय ठरलेली बहुसंख्य नाटकं गुजराथी रंगमंचाने आजतागायत आत्मसात केलेली आहेत. तुलनेने गुजराथीतून मराठीत आयात होणाऱ्या नाटकांची संख्या अत्यल्प आहे. (गुजराथीत मूळ नाटककारांची संख्या कमी असल्याचा हा परिणाम असावा) या नाटकाच्या निमित्ताने त्या देवाण-घेवाणीत थोडी भर पडली ही आनंददायी घटना आहे.

लष्करातील जवानाने ड्यूटीवर असताना काही गैरवर्तणूक केली, नियमांचं पालन केलं नाही तर त्याला कठोर शिक्षा केली जाते. या शिक्षेचा कायद्याच्या वा लष्करी नियमांच्या कुठल्याही मान्यवर पुस्तकांत उल्लेख केलेला नसतो. लष्कराच्या शिस्त पालनाचा हा अलिखित नियम आहे. ही शिक्षा असह्य वेदनादायक असते., त्या 'कोडमंत्र'चाच बळी ठरलेल्या जवानाची आणि त्याच्याच तुकडीत ब-याच वरच्या हुद्द्यावर असलेल्या त्याच्या भावाची केस म्हणजेच 'कोडमंत्र' हे नाटक.

विक्रमवर त्याच्याच भावाचा खून केल्याचा आरोप आहे. ही लष्करातली अंतस्थ बाब असल्यामुळे आरोपीने गुन्हा कबूल केल्यास एक दोन वर्षांच्या शिक्षेनंतर आरोपीची सुटका होण्याची शक्यता असते. विक्रमच्या आईला मुळातच विक्रमवरचा हा आरोप मान्य नाही. ती विक्रमची या आरोपातून सुटका करण्यासाठी महिला वकील अहिल्या देशमुखकडे धाव घेते, अहिल्या केस कशी लढवते, गुन्हेगाराकडून कबूलीजबाब कसा वदवून घेते, याचं थरारक आविष्करण म्हणजेच धडाकेबाज 'कोडमंत्र.'

जवान घडवण्यासाठी लष्करातले अधिकारी ज्या काही कठोर आज्ञा देतात, त्या सैन्याच्या शिस्तीसाठी आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी आवश्यक असतात यात शंकाच नाही, पण एखाद्या प्रामाणिक निष्ठावान सैनिकाचा जीव जाण्याइतपत हे कौर्य, ताणावे का? हा लष्करी व्यवस्थेलाच विचारलेला प्रश्न हेच खरं या नाट्य प्रयोगाचं लक्ष्य असायला हवं. मराठी प्रयोगाच्या संयमित हाताळणीमुळे बऱ्याच प्रमाणात हे उद्दिष्ट सफल झालं आहे. गुजराथी प्रयोग 'कानठळी' आहे, असे बघणारे सांगतात. हे जर खरे असेल तर मराठी प्रेक्षकांची मानसिकता नेमकी ओळखल्याचे श्रेय दिग्दर्शक राजेश जोशी यांना द्यायला हवे. कारण तेच गुजराथी आवाजी प्रयोगाचे दिग्दर्शक आहेत. अर्थात या यशात मराठी कलावंतांचा सिंहाचा वाटा आहे. संवादातील मेलोड्रामा वास्तवतेच्या पातळीवर आणण्याचे कसब सर्वस्वी रुपांतरकार विजय निकम यांचे.

दिग्दर्शकाने सर्व कलावंतांच्या हालचाली त्या त्या भूमिकेनुसार अगदी चोख बसवल्या आहेत. त्यातील शिस्त अधोरेखित करण्याजोगीच. लष्करातील व्यक्तिरेखांच्या बोलण्यातील जोरकस ठसका आणि बाह्य जगतातील व्यक्तिरेखांची स्वाभाविकता यांच्यातील विरोधाभास प्रभावी करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. पायऱ्यांच्या, उंचव टयांचा योग्य वापर करून सैनिकी गतीशी मेळ साधला आहे. लष्करी गणवेशापासून ते मृत जवानाच्या शवपेटीला अखेरची मानवंदना देण्यापर्यंत सर्व सैनिकी कृती अगदी तपशिलातून तंतोतंत उभ्या केल्या आहेत. व्यावसायिक रंगमंचावरून असे काही पाहायला मिळण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी. या नाट्यप्रयोगाच्या लोकप्रियतेचे हे आणखी एक कारण आहे. (कॅडेटप्रशिक्षक वॅलेंटाईन फर्नांडीस, संदीप शर्मा यांना धन्यवाद) संचलन, सराव इ.सर्वच लष्करी हालचाली दिग्दर्शकाने प्रेक्षकांच्या अगदी नाकासमोरच घडवल्या आहेत. सैनिक, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरूनच मार्चिंग करून जातील की काय, अशी धास्ती वाटते. सैनिकांच्या सर्व कृती रंगमंचाच्या मागच्या जागेत (स्टेजअप ) घेतल्या असत्या तर एकूण दृश्यात्मकतेला एक कलात्मक उंची प्राप्त झाली असती. आताच्या प्रयोगासारखी दृश्ये ढोबळ झाली नसती. दिल्लीचे प्रजासत्ताक दिनाचे संचलनदेखील प्रेक्षकांना खूप लांबूनच बघावे लागते आणि त्यामुळे ते अधिक अद्भुत वाटते.

प्रसाद वालावलकर या प्रयोगाचे नेपथ्यकार आहेत, गुजराथी आणि मराठी प्रयोगाचे दिग्दर्शक व नेपथ्यकार सारखेच असल्यामुळे दोघांनाही मूळ गुजराती प्रयोगाची प्रतिकृती मराठीसाठी काढणे सोपे गेले असावे. नेपथ्यात नाटकातील सर्व स्थळे एकत्र आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती सर्व लख्ख उजेडात रंगमंचावर एकमेकांना खेटून उभी राहिलेली दिसतात आणि एकूण दृश्याला फॅणटसीचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे लष्कराची विशालताच आक्रसून गेली. सैनिकांना मोकळे आकाश दिसू दिले नाही तर ते लुटूपुटुचेच वाटणार! येथे सायक्लोरामाचा वापर करणे आवश्यक होते. रंगमंचाचा अवकाश सायक्लोरामामुळे अधिक विस्तृत भासला असता. त्यासाठी थोडे 'काळोख' चालले असते. त्यामुळे दृश्ये प्रत्ययकारी झाली असती आणि प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळाला असता. असो! (ब्लॅकआउट्सच्या अभावामुळे प्रेक्षकांवर आघाती प्रसंगांचा मशीनगनी मारा झाला.)

देहबोलीच्या बाबतीत प्रथमतः दाद दिली पाहिजे ती जवानांना. 'मराठा इंफनटरी' संचलन करीत थेट स्टेजवरच आल्याचा शिस्तबध्द भास त्यांनी निर्माण केला .उमेश जगताप, अतुल महाजन, मिलिंद अधिकारी शिवाय संजय महाडिक, अमित जांभेकर, इ.लष्करातील मंडळींना त्यांच्या हुबेहूब आणि वेधक कामगिरीबद्दल एकदम ठेक्यात सॅल्युटच ठोकला पाहिजे.. विक्रम गायकवाड यांनी वकिलाच्या भूमिकेत लष्करी बाजू बाणेदारपणे मांडली .स्वाती, कौस्तुभ दिवाण यांनी छोट्या भूमिकेतही आपला ठसा उमटवला.

कर्नल प्रतापराव निंबाळकरच्या भूमिकेत अजय पूरकर यांनी लष्करातल्या उच्च पदावरची मग्रुरी अगदी धारदारपणे व्यक्त केली (ते एक उत्तम गायक नट आहेत, हे सांगूनही कुणाला पटणार नाही, इतका प्रभाव त्यांनी या गद्य भूमिकेत पाडला) वृत्तीतला जोरकसपणा दात चावत शब्दफेक करून,'खावू का गिळू या 'पद्धतीने त्यांनी व्यक्त केला. धारातीर्थी पडलेल्या मुलाच्या आठवणीने हळवा होणारा बापही त्यांनी सूचकपणे अविष्कारित केल्यामुळे अखेरच्या क्षणी त्याची सर्व पदे काढून घेतली जातात तेव्हाचा त्यांचा भ्रमिष्टपणा प्रेक्षकांना हलवतो. थोडा अतिशयोक्त(लाऊड)वाटणारा हा अभिनय असह्य होईपर्यंत ताणला जात नाही ही जमेची बाजू आहे. तलवारीच्या पात्याच्या टोकाने कर्नलच्या छातीवरची पदके व फिती काढून टाकण्याचा प्रसंग थरारक आहे.

मुक्ता बर्वेने ज्या आत्मविश्वासाने आणि ठामपणे कर्नलांचे वाग्बाण परतवले त्याला तोडच नाही. कर्नलांची आक्रमक तप्तता आणि महिला वकिलाचा खमक्या शांतपणा याच्या विरोधाभासातून एक वेगळेच नाट्य उभे राहते. समोरच्याकडून अखेरचा कबुलीजवाब उचकटून काढताना मुक्ताने संवादांना दिलेली गती तर अप्रतिमच!

मी पाहिलेल्या मराठी प्रयोगात तरी पार्श्वसंगीत सौम्य होतं आणि प्रकाश योजना भडक नव्हती हा नाट्यप्रयोग म्हणजे एक युद्धच. मैदानातील जवान आणि कोर्टातील लष्करी अधिकारी यांच्यामधलं. या रणयुध्दाची सांगता झाल्यानंतर प्रेक्षकांवर देशभक्तीचे उमाळे काढण्याची सक्ती केली नाही, हे मराठी नाट्यवेड्यांचे भाग्यच समजायला हवे.आवर्जून घ्यावा असाच हा रणानुभव आहे.निर्मात्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!

निर्माते _भरत भगवानदास ठक्क र.दिनकर पेडनेक र मुकता बर्वे )

Kamlakar Nadkarni has been a drama critic for 45 years. He has received various awards for the same from institutions such as the Akhil Bhartiya Natya Parishad. He has written a book on Chattrapati Shivaji and has also published books on theatre. His book ‘Mahanagari Natak’, published in 2015, is a compilation of his critical writing on plays he saw between 2000 and 2010. His upcoming book ‘Natki Natak’ will dwell on the history of the Maharashtra State Competition plays, right from Annasaheb Kirloskar. He was an active worker for ‘Bal Rangbhoomi’ along with Sudha Karmakar. He has written six plays of which 351390 won an award at the Maharashtra State Competition. Kamlakar Nadkarni has been an actor in his younger days and has won medals for acting in state competition plays.

Click here for the review of the Gujarati production.

Please click here for the preview of the play

read / post your comments


   Discussion Board

About Us | Feedback | Contact Us | Write to us | Careers | Free Updates via SMS