'दादा, एक गुड न्यूज आहे' या नाटकाचं वेगळेपण त्याच्या विषयाच्या हाताळणीत आहे. लग्नापूर्वीचं गरोदरपण निभावणार्या करारी स्त्रिया मराठी प्रेक्षकाला नवीन नाहीत. पण या नाटकात मात्र त्या गरोदरपणाबद्दल नाकारण्यापुरताही अपराधभाव नाही. उलट एका वेगळ्या अनुभवाला सामोरं जाणं आहे. त्या निमित्तानं भूतकाळातल्या कौटुंबिक प्रेमाच्या अभावाला, कोरडेपणाला सामोरं जाणं आहे. बहीण-भावाचं बदलत, वाढत जाणारं नातं आहे. किंबहुना तेच मुख्य कथानक आहे. हे नक्कीच वेगळं आहे, ताजंतवानं आहे.
याचा अर्थ नाटकात सगळं काही आलबेल आहे, असा अजिबात नव्हे.
विनीत (उमेश कामत) हा सीए होऊ घातलेला आणि संघर्ष करून स्थिरस्थावर होऊ बघणारा तरुण. विनीतकडे राहायला आलेली त्याची धाकटी बहीण नमिता (ऋता दुर्गुळे). या दोन पात्रांमधलं हे कथानक. विनीतवर मूकपणे प्रेम करणारी त्याची मैत्रीण मिथिला (आरती मोरे) आणि नमिताचा प्रियकर बॉबी (ऋषी मनोहर) ही आणखी दोन पात्रंही नाटकात आहेत. पण निव्वळ आपल्या संवादाची वाट पाहत न बसता चोख प्रतिक्रिया देत असली, वेळी दादही घेऊन जात असली; तरीही ही दोन पात्रं जणू प्रेक्षकच असल्यासारखी भासली. बहुतेक वेळ या बहीण-भावंडांचं नातं न्याहाळणं आणि त्यांना प्रतिक्रिया देणं हेच या दोन पात्रांचं नाटकातलं काम आहे.
नाटकाचा पूर्वार्ध घटनाप्रधान आहे. गरोदरपणाची बातमी, धक्का, नमिता आणि विनीत यांच्यातल्या चकमकी, बॉबीचं आगमन इत्यादी गोष्टींमुळे पहिला अंक अजिबात रेंगाळत नाही. पण दुसऱ्या अंकात फारशा घटना नाहीत. आहेत ते पात्रांमध्ये होत जाणारे मानसिक बदल. अशा प्रकारच्या बदलांमध्ये प्रेक्षकाला गुंतवून ठेवण्यासाठी लेखन आणि अभिनय या दोन्हींमध्ये जबरदस्त दम असावा लागतो. त्यात दोन्ही गोष्टी काहीशा कमी पडतात. त्यामुळे दुसर्या अंकात प्रचंड पुनरावृत्ती जाणवते. प्रसंग सहजगत्या न येता कष्टांनी घडवून आणलेले आणि कृत्रिम वाटतात. 'तेव्हाचा तू... आणि आत्ताचा तू... किती फरक आहे तुझ्यात' अशा आशयाच्या संवादांतून पात्रांना हा प्रवास दाखवून द्यावा लागतो.
उमेश कामतचा अभिनय काहीसा प्रशांत-दामले-धाटणीचा आहे. लोकप्रिय नट म्हणून प्रेक्षकांवर पडणारी आपली छाप आणि आपल्या व्यक्तिमत्त्वातला उमदेपणा या दोन्ही गोष्टी पुरत्या जाणून असणं आणि त्यांचा हिशेबी वापर करून काही संवादांवर वा हालचालींवर विशेष मेहनत घेणं, त्यांनंतर मिळणार्या प्रतिसादाच्या अपेक्षेत किंचित विराम घेणं हे या धाटणीचं वैशिष्ट्य. पण वावरावरची पकड जराही ढिली पडली, तरी त्यामुळे सहजता जाऊ शकते, आणि लेखनाची रचना मुळात सदोष असेल, तर कृत्रिमपणा अधोरेखित होतो. तसंच इथे झालं आणि काहीसा रसभंग झाला. त्याउलट नमिताचं काम करणार्या ऋता दुर्गुळेनं अतिशय सहज आणि समजुतीनं भूमिका केली. सुरुवातीचं हबकलेपण, हळूहळू निर्णयाला आल्यावर येत गेलेला आत्मविश्वास, भावामध्ये बाप शोधणारी धाकटी बहीण ते त्याची आई होऊ शकणारी पूर्ण स्त्री असा प्रवास तिनं फार सहज रेखाटला. आवाजातले चढउतार, वावरातला सहजपणा, जरूर तिथे घेतलेले, नैसर्गिक भासणारे विराम, बोलण्याचा कमीअधिक वेग... हे सगळंच फार सुरेख.
नाटकाच्या रचनेतला दुसरा दोष म्हणजे आईबाप या घटकाचं सोयीस्कररीत्या चौकटीबाहेर राहणं. मध्यमवर्गीय जाणिवांना घट्ट चिकटून असलेल्या आईबापाचे संदर्भ नाटकात आधीच येतात. असं असताना, विसाव्या वर्षी लग्न न करता आई होणाऱ्या मुलीच्या आयुष्यात असे आईबाप जराही ढवळाढवळ करणार नाहीत यावर कसा विश्वास ठेवावा? आईबापाची अनुपस्थिती ही निव्वळ नाटकाची गरज म्हणून येते आणि त्यामुळे अविश्वासार्ह, नकली वाटते.
एका अविवाहित, सुखवस्तू, मध्यमवर्गीय तरुणाचं घर जसं असेल, तसं नेपथ्य आहे. पण अगदी समोरच दर्शनी भिंतीवर लावलेल्या त्या नदीच्या चित्राचं प्रयोजन कळलं नाही. खुल्या आणि उंचावरल्या अशा झोपण्याच्या खोलीचा वापर पात्रांच्यातले संबंध दर्शवायला, पात्रांची रचना साधून काहीएक विधान करायला आणि काही ठिकाणी विनोदासाठीही चांगला केला आहे. पण पुरेशा वेळा, काही वेळा ओढून-ताणून, विनोद आणूनही नाटकाची काहीशी भावबंबाळ प्रकृती लपता लपत नाही.
बाकी अजूनही मराठी मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्यात अमेरिकेला कामाकरता जाणे ही सुवर्णसंधी, त्याबद्दल कथानकात कसलेही नीट तपशील न देता वरवरचं बोलत राहण्याची सवय, आणि 'आपल्या माणसांना सोडून न जाता इथेच राहण्याची संधी' कथानकात वापरून घेणं... इत्यादी बाबी अगदी अपेक्षित आणि साचेबद्ध आहेत. त्या कधी बदलतील?
ता. क. - नाटकाच्या श्रेयनामावलीच्या घोषणेमध्ये केशभूषा, प्रसिद्धी, सुलेखनकार / रचनाकार हे रुळलेले शब्द सोडून हेअर ड्रेसर, पब्लिसिटी, डिझाइन्स हे शब्द घुसडण्यामागचं कारण कळलं नाही.
मेघना भुस्कुटे भाषांतरकार आणि मराठी ब्लॉगर असून भाषा, साहित्य आणि प्रमाणलेखन या विषयांत तिला विशेष रस आहे. अनेक ऑनलाईन आणि छापील नियतकालिकांतून तिने लेखन व संपादन केले आहे.