'सॉफ्टकॉर्नर' प्रायोजित आणि 'अस्तित्व' आयोजित 'कथाहोत्र २०२६': जागतिक साहित्याचा जागर करणारी एक क्रांतिकारी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा!
June 9, 2026 15:01:29 IST MTG editorial
मराठी रंगभूमीवर नवे प्रयोग, नवे विषय आणि नव्या अभिव्यक्तीची परंपरा नेहमीच जपली गेली आहे. याच परंपरेला आणखी व्यापक आणि जागतिक स्वरूप देण्यासाठी अॅस्तित्व आणि सॉफ्ट कॉर्नर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कथाहोत्र २०२६' या राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमाचे विशेष क्युरेशन 'Curated Classics' तर्फे करण्यात येणार आहे.
'कथाहोत्र' ही केवळ एक स्पर्धा नसून साहित्य, रंगभूमी आणि सर्जनशीलतेचा एक वेगळा यज्ञ आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय साहित्यातील निवडक, पण आजवर मराठी रंगभूमीवर फारसे न सादर झालेले कथाविश्व रंगमंचावर आणण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे.
४१ कथांचा विशेष स्टोरी बँक
या स्पर्धेसाठी 'Curated Classics' च्या साहित्यिक अभ्यासातून ४१ भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कथांचा खास 'स्टोरी बँक' तयार करण्यात आला आहे. सहभागी गटांना दोन वेगळ्या एकांकिका सादर कराव्या लागतील. त्यातील एक भारतीय कथावर आधारित असेल आणि दुसरी आंतरराष्ट्रीय कथावर आधारित असेल.
या संकल्पनेतील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही दोन गटांना एकच कथा सादर करता येणार नाही. त्यामुळे प्रेक्षकांना विविध कथांचे, विचारांचे आणि सादरीकरण शैलींचे वेगळेपण अनुभवायला मिळेल.
प्रयोगशील रंगकर्मासाठी संपूर्ण मोकळीक
'कथाहोत्र २०२६' पारंपरिक स्पर्धांच्या चौकटींपलीकडे जाणारा उपक्रम आहे. या स्पर्धेत दिग्दर्शक, लेखक, अभिनेता किंवा तंत्रज्ञ यांना एकाहून अधिक नाटकांमध्ये सहभागी होण्याची मुभा असेल. त्यामुळे वेगवेगळ्या गटांसोबत काम करण्याची, नव्या कल्पना तपासण्याची आणि अधिक व्यापक रंगानुभव घेण्याची संधी रंगकर्मींना मिळणार आहे.
तसेच कथांचे रूपांतर अधिक प्रभावी व्हावे यासाठी आयोजकांकडून मूळ कथा, प्रमाणित मराठी अनुवाद, कथासार आणि संभाव्य रूपांतर रचना यांचा सविस्तर दस्तऐवज सहभागी गटांना दिला जाणार आहे.
कोण सहभागी होऊ शकते?
ही स्पर्धा व्यावसायिक, प्रायोगिक, हौशी आणि नवोदित नाट्यसंस्थांसाठी खुली आहे. मात्र सादरीकरण करणाऱ्या कलाकारांना किमान तीन वर्षांचा रंगभूमीवरील अनुभव असणे आवश्यक आहे.
नोंदणीसाठी कोणतेही छापील फॉर्म नसतील. जास्तीत जास्त २० गटांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर संधी दिली जाईल.
नोंदणी आणि कथा वाटप
नोंदणी शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहे.
स्थळ: परिषद कक्ष, तळमजला, यशवंत नाट्य मंदिर, १२२-डी, जे. के. सावंत मार्ग, जोशी वाडी, माटुंगा पश्चिम, मुंबई ४०००१६.
नोंदणीनंतर त्याच ठिकाणी संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत लॉटरी पद्धतीने कथा निवड आणि सादरीकरण स्लॉटचे वाटप होईल. गटांना एकदाच परस्पर संमतीने कथा बदलण्याची म्हणजेच 'शफल' करण्याची संधी दिली जाईल.
प्रवेश फी आणि तिकीट परतावा योजना
स्पर्धेची प्रवेश फी ₹२,००० आहे. विशेष म्हणजे ही फी ग्रँड फिनालेच्या प्रेक्षक तिकिटांच्या स्वरूपात परत केली जाणार आहे.
पूर्व फेरीतून बाहेर पडलेल्या गटांना ₹६०० मूल्याची ३ तिकिटे मिळतील.
एलिमिनेशन राऊंडमध्ये बाहेर पडलेल्या गटांना ₹१,२०० मूल्याची ६ तिकिटे मिळतील.
अंतिम फेरीत पोहोचलेल्या गटांना ₹२,००० मूल्याची १० तिकिटे मिळतील.
स्पर्धेच्या तीन महत्त्वाच्या फेऱ्या
पहिली फेरी म्हणजे पूर्व फेरी, रविवार १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत परिषद कक्ष, यशवंत नाट्य मंदिर येथे होईल. या फेरीत प्रत्येक गटाला प्रत्येक कथेसाठी १० मिनिटे मिळतील. या वेळेत दिग्दर्शकीय दृष्टिकोन, संकल्पना आणि रूपांतराची दिशा परीक्षकांसमोर मांडावी लागेल.
दुसरी फेरी म्हणजे एलिमिनेशन राऊंड, शनिवार २९ ऑगस्ट आणि रविवार ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सी-हॉल, यशवंत नाट्य मंदिर येथे होईल. या फेरीत निवड झालेल्या १० गटांकडून २० एकांकिका रिहर्सल फॉरमॅटमध्ये सादर केल्या जातील.
या फेरीतील एक खास बाब म्हणजे 'स्टोरी टेकओव्हर' धोरण. एखाद्या उत्कृष्ट कथेला पुढे नेण्याची संधी ती कथा मूळ गटासोबत न गेल्यास, पुढे निवड झालेल्या गटाला गुणवत्ता पाहून मिळू शकते.
तिसरी आणि अंतिम फेरी शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून यशवंत नाट्य मंदिराच्या मुख्य सभागृहात होईल. या ग्रँड फिनालेमध्ये सर्वोत्तम ५ गट १० एकांकिका पूर्ण तांत्रिक सादरीकरणासह सादर करतील. यात ५ भारतीय आणि ५ आंतरराष्ट्रीय कथांवर आधारित एकांकिका असतील.
फक्त विजेते, उपविजेते नाहीत
'कथाहोत्र २०२६' ची आणखी एक वेगळी भूमिका म्हणजे येथे दुसरा किंवा तिसरा क्रमांक नसेल. आयोजकांच्या मते कलात्मक उत्कृष्टतेला क्रमांकांत विभागणे योग्य नाही. त्यामुळे प्रत्येक विभागात केवळ सर्वोत्तम कामगिरीलाच गौरवण्यात येणार आहे.
एकूण पारितोषिक रक्कम ₹१,१०,००० आहे.
'महा-नाट्य सन्मान' अंतर्गत सर्वोत्तम भारतीय कथा रूपांतरासाठी ₹४०,००० आणि सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय कथा रूपांतरासाठी ₹४०,००० अशी पारितोषिके दिली जातील.
याशिवाय दिग्दर्शन, लेखन आणि रूपांतर, अभिनय तसेच संगीत, प्रकाशयोजना आणि नेपथ्य अशा तांत्रिक विभागांमध्येही सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कलाकारांना आणि तंत्रज्ञांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे दिली जातील.
भारतीय रंगकर्मींसाठी एक वेगळी संधी
मराठी रंगभूमीवर नवे साहित्य, नवे विचार आणि नवे रंगरूप आणू इच्छिणाऱ्या नाट्यसंस्था आणि रंगकर्मींना 'कथाहोत्र २०२६' ही मोठी संधी ठरू शकते. भारतीय आणि जागतिक साहित्याचा अभ्यास, त्याचे मराठी रूपांतर आणि त्यातून सशक्त रंगमंचीय सादरीकरण घडवण्याची ही प्रक्रिया रंगकर्मींसाठी समृद्ध करणारी ठरेल.
ज्या नाट्यगटांना या ऐतिहासिक रंगचळवळीचा भाग व्हायचे आहे, त्यांनी आपल्या गटाचे नाव, ठिकाण, संपर्क तपशील आणि सोशल मीडिया हँडल्स आयोजकांकडे पाठवून आपली रुची नोंदवावी. यानंतर त्यांना स्टोरी बँकचा आगाऊ प्रवेश मिळू शकेल.
अॅस्तित्व ही संस्था गेली जवळपास तीन दशके महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि नाट्य चळवळीत सक्रिय असून नवोदित आणि प्रस्थापित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आली आहे.
'Curated Classics' जागतिक साहित्य, अनुवाद आणि कथांच्या रंगमंचीय रचनेवर काम करणारा उपक्रम असून जागतिक साहित्य आणि प्रादेशिक रंगभूमी यांच्यातील दुवा मजबूत करण्याचा प्रयत्न करतो.
*Mumbai Theatre Guide takes no responsibility for change in schedule.